'द रायकर केस' थराराची परिसीमा

    22-Apr-2020
|


- वेदवती चिपळूणकर 


The Raikar case _1 &

लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या सर्वांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी संपूर्ण मनोरंजन क्षेत्राने घेतली आहे. नवीन चित्रपट येऊ शकत नसले किंवा दैनंदिन मालिकांचे नवीन भाग येऊ शकत नसले तरीही सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सनी प्रेक्षकांची काळजी घ्यायचं ठरवलं आहे. अनेक पाश्चात्य वेब सिरीज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आहेत. त्याच्या बरोबरीने जेव्हा आपल्या सर्वांना ‘रिलेट’ होऊ शकणाऱ्या ‘आणि काय हवं...’, ‘समांतर’, ‘पंचायत’ अशा अनेक वेब सिरीज येऊ लागल्या तेव्हा प्रेक्षकांनी त्यांनाही डोक्यावर घेतलं. अशीच एक रोमांचक आणि थरारक वेब सिरीज म्हणजे ‘द रायकर केस’. Voot select ने आणलेल्या या वेब सिरीजमध्ये अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, अजय पूरकर, ललित प्रभाकर, मनवा नाईक असे अनेक मराठी कलाकारही आहेत.


रायकर कुटुंबातल्या सर्वात लहान मुलाचा मृत्यू होतो आणि पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे खरोखरच आत्महत्या की खून? एका संपूर्ण कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढणारी ही एक मर्डर केस. जिचा शोध करताना कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची अनेक रहस्य उघडकीला येत जातात आणि कुटुंबातल्या इतर जणांना नव्याने धक्का बसतो. वरवर समर्थक वाटणारे राजकीय मित्रही एका क्षणी व्हिलनच्या भूमिकेत जाऊन प्रेक्षकांना संभ्रमात टाकतात. प्रत्येक एपिसोड सुरू होतो एका नव्या मर्डर थिअरीने आणि संपतो एक नवीन प्रश्न घेऊन! नेमकं कोण अडकलंय, कोण निर्दोष आहे, कोण अनभिज्ञ आहे याबद्दल शेवटपर्यंत प्रेक्षक केवळ अंदाजच लावू शकतात. त्यामुळे सस्पेन्स टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ही वेब सिरीज अत्यंत उत्कंठावर्धक आहे असं म्हणायला हरकत नाही.


इतर तांत्रिक गोष्टींचा विचार करता सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे कलाकारांचा अभिनय! आतापर्यंत चॉकलेट बॉय किंवा फिलॉसॉफर म्हणून ओळख असलेल्या ललित प्रभाकरने आपल्या भूमिकांचा गुलाबी रंग बदलून थेट राखाडी करून टाकला आहे आणि त्या रंगात तो पूर्णपणे एकरूप होऊन गेला आहे. आतापर्यंत त्याच्या चाहत्यांनी न पाहिलेलं त्याचं हे रूप चाहत्यांच्या पसंतीस पुरेपूर उतरलं आहे. अश्विनी भावे यांचं मायाळू आणि कणखर अशी दोन्ही रूपं या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतात. दिग्दर्शन विचारात घेताना प्रत्येक एपिसोड नव्या थिअरीने सुरू करण्याच्या कल्पनेला नक्कीच दाद दिली पाहिजे. संपूर्ण सिरीजची कथा, पटकथा आणि संवाद यांत उणिवा काढण्याची संधी कुठेही मिळत नाही.


एक थरारक वेब सिरीज बांधणं आणि शेवटच्या एपिसोडपर्यंत उत्कंठा ताणून धरणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. ‘द रायकर केस’ला केवळ तेवढंच जमलंय असं नाही तर शेवटच्या भागातही पुढच्या सीझनचं रहस्य प्रेक्षकांच्या डोक्यात सोडून देऊन पहिला सीझन संपवला आहे. त्यामुळे ‘द रायकर केस’च्या दुसऱ्या पर्वाकडून अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.


-वेदवती चिपळूणकर