मेंदूच्या कानाखाली मारणारी अप्रतिम कलाकृती! थप्पड! 👋

    02-Mar-2020
|


Thappad_1  H x

काही काही सिनेमांचा मेसेज असा खाटकन कानाखाली बसतो, तर काही काही सिनेमांचा मेसेज प्रत्येक सीनला वैचारिक कानाखाली मारत राहतो.

थप्पड हा सिनेमा हे दोन्ही करतो!

अप्रतिम मांडणी आणि उत्कृष्ट संवाद. खूप दिवसांनी इतका साधा पण तरी पॉवरफुल आणि फेमिनिझमचा खरा आणि दर्जेदार अर्थ सांगणारा सिनेमा बघायला मिळाला. मध्ये राणी मुखर्जी चा मर्दानी २ पाहून थोडं असच वाटलं होतं, पण थप्पड त्याच्याहून खूप पटीने जास्ती खोल जखम देतो जी अत्यंत गरजेची वाटते.


अभिनय तर सगळ्याच पात्रांचा सुरेख झालाय. अनेक वर्षांनी दिया मिर्झाला आणि तन्वी अझमिला इतक्या छान रोल मध्ये पाहून प्रेक्षकांना नक्कीच बरे वाटेल.. कुमुद मिश्रा अप्रतिम आहेच पण त्याला रत्ना शाहची जोड मिळाल्यावर खूपच खुलतं त्यांचं नातं. तापसी भाव खातेच सिनेमात, पण माया सरावचं वकिलाचं पात्रं आणि गितिका वैद्य हिचं घरात काम करणारी सुनीता हे पात्रं खूप जास्ती लक्षात राहतं.

काहींना हा सिनेमा जरा संथ वाटू शकतो. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक सीन ह्याचे इतके महत्त्व आहे सिनेमात! गाणी साजेशी, कास्टींग सुरेख. अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागू ह्यांना संवादांसाठी बहुदा सगळे अवॉर्ड पुढच्या वर्षी मिळायला बेशक हरकत नाही. सिनेमात कितेक ठिकाणी कडाडून टाळ्या पडतात प्रेक्षकांकडून.

१२-१४ वर्षांपासून पुढच्या सगळ्या वयातील सर्वांनी पहावा असा हा सिनेमा आहे. चुकवू नका. गृहीत धरली गेलेली प्रत्येक बाई, आणि तिच्या ह्या परिस्थितीला कारण समाजातील अनेक घटक इथे खूप चातुर्याने मांडले आहेत.

विचार करायला भागच पाडतो सिनेमा.

सिनेमा बघून झाल्यावर घरी जाऊन आपल्या आईला/ बायकोला / वहिनीला एक प्रेमळ आपुलकीची आणि आदराची हाक मारायला तुम्ही ह्या पुढे विसरणार नाही...

हे अगदी नक्की! आवाजच असा निघणार मेंदू खाली!

- आदित्य महाजन