पानिपत.. मन स्तब्ध, डोळे नकळत पाणावतात, पण..

    15-Feb-2020
|
 
-सिद्धी सोमाणी- 
 
सध्या, दिल्लीहून शंभर-दीडशे किमीवर असलेल्या त्या ऐतिहासिक जमिनीवर खास असे काही नाही. रिकामं मैदान, गवत, ऊन, बस! पण त्या रिकाम्या मैदानावर पाय ठेवताच आपलेपणाची ऊब जाणवते. या जमिनीखाली कुठेतरी आपल्या मराठी माणसांच्या रक्तखुणा असतील, असे भासते. मन स्तब्ध, डोळे पाणावतात!  
 
जब देश पर खतरा बडा था, तब पानिपत मे भगवा गाडे अकेला मराठा खडा था! पानिपतचं तिसरं युद्ध, मराठ्यांची ख्याती, शौर्य, सामर्थ्य आपल्यापासून लपलेलं नाही. नुकतेच पानिपतच्या त्या पराक्रमी भूमीला प्रत्यक्षात नमन करण्याचं भाग्य लाभलं आणि त्या ज्वलंत जागेवरचा पहिला श्वास घेतच, कुठेतरी वाचलेल्या चार ओळी आठवल्या..'इक अब्दाली आया था, पानिपत को रौद गया, आज ऐसा दिन आया, मेरा दिल फिर रोया हैं!'

560_1  H x W: 0 
 
महाराष्ट्राच्या इतिहासातील ओली जखम म्हणून ओळखलं जाणारं पानिपतचं ते युद्ध अजूनही मराठी मन नकळत हळवं करतं. शिवाजीमहारजांच नाव घेता ज्याची छाती अभिमानाने फुलत नाही आणि पानिपतची कहाणी ऐकुन ज्याचं मन हळव होत नाही, तो मराठी माणूस नाही, असे म्हणतात. त्या प्रत्यक्ष जागी जाऊन हे सत्य अगदी प्रकर्षाने जाणवलं.
 
मुळात पानिपतच युद्ध प्रत्यकाने मनात कोरावं ते यासाठी की राष्ट्राच्या सुरक्षेकरता प्रचंड संख्येने बाहेर पडणारा महाराष्ट्र हा एकमेव देश. पुढे त्या सात-आठ तासाच्या युद्धात, मध्ययुगीन काळात दोन्ही बाजूची जवळ जवळ डिड लाख माणसं मृत्युमुखी पडणं, असाही प्रसंग राष्ट्रीय जीवनात अद्याप घडलेला नाही.
 
560_2  H x W: 0
 
कुंजपुऱ्यावरून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या मराठा सैन्याने नोव्हेंबर 1760 साली पानिपतमध्ये तळ ठोकला. मराठा सैन्य दक्षिणेतून मोहिमेला निघालं, तेव्हा त्या सालचा जानेवारी महिना संपत आला होता. उत्तरेच्या थंडीत गारठून व्हायला झालं. मोहिमेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पानिपतच्या आसपासच्या गावांमधली झाडंही शिल्लक राहिली नसल्याने सरपणाला लाकडं मिळणं मराठा फौजेला कठीण झालं होतं. परिणामी मराठा सैन्याचे हाल होत होते, असं अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये नमूद केलं आहे.
 
त्या उलट अफगाण सैनिकांचा पेहराव मात्र थंडीचा सामना करण्यासाठी योग्य होता. त्यांच्या अंगावरचा चामड्याच्या कोटासारखा पोशाख थंडीपासून रक्षण करण्यासाठी योग्य होता. मराठ्यांसोबत यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू, व्यापारी असे सुमारे 30-40 हजार बिनलाढाऊ लोक होते. या लोकांचीही खाण्यापिण्याची सोय करण्यात सैन्याला अडचणी येऊ लागल्या. रसद, नगद, धन, धान्य सर्व काही संपलं असता, राष्ट्र सुरक्षेसाठी जिद्दीने लढू पाहणारे मराठे जवळ जवळ दीड-दोन महिना उपाशी राहिले.

560_2  H x W: 0 
 
अशा परिस्थितीतही ते लढले, जिंकले नाही, पण इतिहास मात्र घडवला. खुद्द अब्दालीनेच या युध्दाबाबत लिहून ठेवले आहे, "युध्दादिवशी मराठ्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांची युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे व दिसणे अशक्य!".

560_1  H x W: 0 
 
सध्या दिल्लीहून एक दीडशे किमीवर असलेल्या त्या ऐतिहासिक जमिनीवर खास असे काही नाही. रिकामं मैदान, गवत, ऊन, बस! पण त्या रिकाम्या मैदानावर पाय ठेवताच आपलेपणाची ऊब जाणवते. या जमिनीखाली कुठेतरी आपल्या मराठी माणसांच्या रक्तखुणा असतील, असे भासलते. मन स्तब्ध, डोळे पाणावतात! बाकी सत्य, कहाणी जरी सर्वांना माहीत असली तरी पराभवाच्या ढगाआड झाकोळलेला हा असा विजय, मराठ्यांची जिद्द, त्यांचे सामर्थ्य दृष्टिपुढे ठेवण्यास यशस्वी झाला, हे नक्की! पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याची नाही तर भारताच्या इतिहासाची दिशा बदलली असेही म्हटल्यास वावगं ठरणार नाही.