पानीपत : मराठ्यांच्यी शौर्य गाथा

    14-Jan-2020   
|

14 जानेवारी 1761, भारतीय इतिहासातला एक फार महत्त्वाचा दिवस , पण आपल्याला सांगतांना तो काळादिवस किंवा सगळं गमावलं अशा रीतिने सांगितला जातो , हे योग्य नाही ,पानीपत चे तिसरे युद्ध हे फक्त एक युद्ध नव्हे तर महाभयंकर संग्राम होता , मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी सव्वालाख योद्धे मृत्युमुखी गेले होते. खरतरं ही त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी दिलेली आहुतीच होती , आज 259 वर्षांनंतर हे युद्ध किंवा याबद्दल बोलायची का गरज भासतेय??कारण काळाच्या ओघात या रणांगणाचं सत्य कुठेतरी हरपलयं आणि ते सगळ्यांसमोर आणायची आज नितांत आवश्यकता आहे.


paniPat_3  H x

 


छत्रपती शिवाजी महाराजांचे हिदंवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी पेशव्यांनी आपल्या भक्कम खांद्यांवर पेलली होती, बाजीराव पेशव्यांचे जेष्ठ्य पुत्र श्रीमंत नानासाहेब पेशवा हे प्रधान होते आणि त्यांचे चुलत बंधू म्हणजे श्रीमंत सदाशिव राव पेशवा अर्थात भाऊसाहेब हे पानीपताच्या युद्धात सेनापती होते , त्यांचा अत्यंत कोवळ्या वयातला पुतण्या म्हणजे विश्वासराव नानासाहेब पेशवा हा त्यांच्या सोबत होता , तसेच मल्हारराव होळकर , मेहंदळे, जनकोजी शिंदे, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, इब्राहिम गारदी हे त्यांच्या फौजेचे मुख्य योद्धा होते, आणि समोर होता अत्यंत क्रूर , कडवट, राकट असा अहमदशाह अब्दाली , जो याआधी दोनदा भारताला चटके लावून गेला होता आणि त्याची आभाळाऐवढी फौज, त्या फौजेत अत्यंत क्रूर , आणि रासवट लढवैये मराठ्यांना नेस्तनाबूत करायला तयार होते , हे पानीपतचे तिसरे युद्ध होते या आधीच्या दोन्ही युद्धात एवढा भीषण संग्राम झालेला नव्हता.

वास्तविक पाहता कुठे पुणे कुठे पानीपत?? पण दिल्लीच्या गादीचं आम्ही रक्षण करू फक्त येवढा शब्द पाळायला हे भलं मोठ्ठं अंतर, इतका प्रवास, पेशवे सगळं ऊर्जेने व संपूर्ण ताकदीने करायला निघाले. होती तेवढी सेना , उपलब्ध त्या सोयींना पत्करून ही मंडळी पुढे वाढली, कशासाठी हो??फक्त दिलेल्या शब्दाचा मान राखायला. इतकेच नव्हे तर भारतभूमी च्या छातीवर पायदेऊन एक परदेशी आक्रमणकारी दिल्लीच्या गादीवर नाही बसू द्यायचा या भावनेनी , कोण होती हो ही माणसं???

 

paniPat_1  H x

 

आपल्या शेजारच्या घरात चोरी होते तरी आपल्याला पत्ता लागत नाही हो, आपण "काय माहीत बुवा" असं उत्तर देऊन मोकळे होतो , विचार करा त्या वेळी ही मंडळी फक्त आपल्या देशासाठी , गादीचं रक्षण करण्यासाठी पुण्याहून थेट पानीपत गाठते, ते कसे इतक्या दूर गेले असतील??काय आणि कशी सोय केली असेल??राहणे , झोपणे, दिनचर्या, गडी माणसे, बायका, जनावरे इतका मोठ्ठा लवाजमा , सगळ्यांची व्यवस्था , प्रवास , वारा-वावटळ, पाणी-पाऊस, दर्या-खोर्यातून कसे गेले असतील?? कल्पना तरी करू शकतो का आपण??? त्यांच धान्य संपतय, त्यांच्याकडे मुबलक साधने नाही , पुढची सोय नाही , आहे त्याचात , आणि जमेल ते करायला तत्पर अशी ही मराठ्यांची फौज़ , ही काय साधी माणसं होती का हो??? शक्यच नाही... हे सगळे देवदूत होते , जे अब्दाली सारख्या सैतानाला धडा शिकवायला निघाले होते .

पण आज आपण त्यांना कोणत्या रूपात बघतोय????


एक सिनेमा आला त्यात आपण पानीपत चा संग्राम पाहिला , पण.... पण आपण सत्यापासून कितीतरी लांब आहोत हे आपल्यापैकी कोणाला माहिती आहे??आजच्या तरूण पिढीला , लहान मुलांना किती माहिती आहे, काय होतं पानीपत च तिसरं युद्ध ?? सिलेबस मधल्या चार ओळींशिवाय पाचवी त्यांना ठाऊक नाही , आपण हे युद्ध हारलो , फार नुकसान झालं, मराठा राज्याचं पतन सुरू झालं , अशी त्यांना सामाजिक विज्ञान या पुस्तकात माहिती दिली आहे , या पलीकडे काही नाही , आणि त्यात भर पडतेय काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटाने. आशुतोष गोवारीकर निर्मित "पानीपत" हा चित्रपट या युद्धाची शौर्यगाथा नव्हे तर इतिहासाला उलट-सुलट दाखवण्याचा अट्टाहास मात्र आहे. हा सिनेमा पाहतांना शंका येते कि हाच का तो भाऊसाहेब पेशवा जो 1500 सूर्यनमस्कार रोज घालायचा?? हीच का ती पतिव्रता आणि खमकी पार्वतीबाई ?? जिने पानीपत युद्ध तर पाहिलचं आणि त्यानंतर ही माधवराव पेशव्यांचा भक्कम आधार बनली.


paniPat_1  H x

 


काय दाखवायचं होत यांना आणि काय दाखवलं आहे. अरे भारतात तशेच भारत विरोधी नारे लागताहेत त्यात तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसं ऐतिहासिक पात्रांवर प्रयोग करता???? आणि कोणी यांचा विरोध कसा करत नाही, कारण आम्ही यातच समाधानी झालो कि कोणीतरी हा विषय सिनेमासाठी निवडला, पण मित्रांनो आज तुम्हाला , आम्हाला गरज आहे सत्य हे जाणून घ्यायची. राजकारण आणि मनोरंजन या गोष्टींना थोडं बाजूला ठेवून इतिहासात लक्ष घालायची गरज आहे. तरूण पिढीला आणि लहान मुलांना हे सत्य कळणं आजच्या काळाची गरज आहे. आपला गौरवशाली इतिहास त्यांचा डोळ्यासमोर आलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पुढे कसे वाढले, भारतभूमीची सेवा पूर्ण निष्ठेने आणि प्राण पणाला लावून मराठा साम्राज्य कसं पेशव्यांनी पुढे नेलं, "अटक पासून कटक पर्यंत"  म्हणजेच अटकेपार भगवा झेंडा फडकवला , इतकच नव्हे तर अब्दाली सारख्या करड्या योद्ध्याला पानिपत च्या युद्धात असा तडाखा दिला कि त्यानी पुन्हा कधीही भारताकडे नज़र फिरवली नाही. 

स्वत: अहमदशाह अब्दालीने भारतातून परत जातांना नानासाहेब पेशवांना पत्र लिहिले , त्यात मजकूर असा ' मी आजवर अनेक लढाया लढलो , पण भाऊसाहेब पेशवांसारखा लढवैया दूसरा होणे नाही , मी फार जड़ मनाने ही जीत स्वीकारतोय आणि आता कधीही परत येण्याची ताकद माझ्यात नाही , मी भाग्यवान होतो कि माझे शत्रू पेशवे होते."


paniPat_4  H x

म्हणायला आपण हे युद्ध हारलो , पण ज़र मराठी फौज़ उत्तरेला गेली नसती तर अब्दाली ने उत्तरेसकट संपूर्ण भारतावर राज्य केलं असतं, पण मराठी फौज ज्या ताकदीनिशी अफगाणी सेनेशी लढली , त्यानंतर एकही परदेशी शासक भारताकडे वळला नाही , ही होती आपली ताकद.... सव्वालाख सैनिक तसेच सदाशिव भाऊ, विश्वासराव, जनकोजी, समशेर बहादूर, असे लाख मोलाचे हीरे आपण या युद्धात गमावले , पण आपल्याला यातून खूपकाही मिळालं... ही मराठी फौजेची निष्ठा , त्यांच मात्रुभूमी वरच प्रेम , जिद्द , पराक्रम, मनगटातला जोर , हे सगळ आजच्या या पिढीला , आम्हाला- तुम्हाला , तरूणांना-मुलांना कळण्यासाठी काहीतरी करायची गरज़ आहे. आणि चित्रपट दिग्दर्शकांना ही विनंती आहे कि फक्त आपल्या काही मंशा पूर्ण करण्यासाठी इतिहासात असे चुकीचे बदल करू नका. भारताच्या इतिहासात दडलेलं, लपलेलं ते शौर्य, ते पराक्रम, ती निष्ठेची पराकाष्ठा बाहेर आणा , "पानीपत" या युद्धाची लखलखती , तेजस्वी बाजू आम्हाला कळू द्या , हे युद्ध आपण हारलो नाही तर हारण्या आधी मराठी फौज़ेनी जे वीरतेचं कळस गाठलं ते सगळ्यां समोर आणा. आजच्या तरुण पिढीला खरा सदाशिव भाऊ आणि विश्वास राव दाखवा , आता हीच या काळाची गरज़ आहे.

 


प्रगती गरे दाभोळकर