वातावरण बदलाचा त्रास तुम्हालाही होतोय ना?

    26-Sep-2019

 
जागतिक तापमान वाढीबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरच झाली आहे. कारण याचा त्रास कुणा एकाला नाही तर सगळ्यांना होतोय. जागतिक परिषदेत देखील पृथ्वीवरील वातावरण बदल यावर भाष्य केले जात आहे. आपण रोजच वृत्तपत्रात जागतिक तापमान वाढ अर्थात 'ग्लोबल वॉर्मिग' याविषयी काही तरी वाचत असतो, मात्र हे सगळे वाचूनही या सगळ्या माहितीकडे तसेच बातम्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र पृथ्वी दिवसेंदिवस जळत आहे आणि यामुळे मानवी जीवन एक दिवस पूर्णपणे नष्ट होणार आहे असा विचार केला तर या समस्येची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. मानवाला प्रगतीच्या पायऱ्या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांती एक दिवस मानव जातीलाच संपविणार आहे याची कल्पना आपल्याला यायला हवी. उद्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या हाऊडी मोदी या कार्यक्रमात देखील जागतिक तापमान वाढ या मुद्द्यावर भाष्य होणार आहे. ७४ व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अनुशंगाने अमेरिकेत होणाऱ्या कार्यक्रमात अमेरिकेचे ऱाष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जागतिक तापमान वाढ आणि यावरील उपाय यावर चर्चा करणार आहेत.


आपण लहान होतो तेव्हा आठवतंय का? उन्हाळ्यात कडक उन पडायचं, पावसाळ्यात धो धो पाऊस आणि थंडीत कडाक्याची थंडी. पण आता? उन्हाळा संपून गेल्यावरही ऊन जात नाही, पावसाळ्यात पाऊस पडत नाही, पडला तर इतका पडतो की ढगफुटी होते, थंडीत इतकी थंडी पडते की थंडीने अनेक लोकांचा मृत्यु होतो. पहिले सारखे सीझन्सच्या आता ठरलेल्या वेळा ठरलेले महीने राहिले नाहीत. हे का होतंय ? तर याचं कारणही ग्लोबल वॉर्मिंगच आहे. आणि याचा त्रास कुणाला होतोय तर तुमच्या माझ्या सकट सगळ्यांना. 
 
ग्लोबल वॉर्मिंग : एक दु:खद सत्य Sad truth you can say... 
 
पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाचे तापमान वाढणे म्हणजे ढोबळ मनाने जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग. असे म्हणता येईल. मात्र याला देखील बरेच कंगोरे आहेत. आजच्या हवामानाचा विचार करता वर सांगितल्या प्रमाणे पावसाळ्यात चटके लागणारे ऊन, भर उन्हाळ्यात पाऊस तर हिवाळ्यात देखील उन्हाळ्यासारखे ऊन यालाच जागतिक तापमान वाढीचे परिणाम म्हणतात. मात्र आपण 'सोशल मिडीयावर' या सगळ्या हवामान बदलाची खिल्ली उडवून मोकळे होतो. उन्हाळ्यात पावसाची मज्जा घेता येते म्हणून या सगळ्या समस्येकडे आपण कळत नकळतपणे दुर्लक्ष करतो.
 
 
नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या समस्यांसाठी आपण निसर्गाला दोष द्यायला विसरत नाही. मात्र अनेक वेळा यातील काही समस्या या मानवनिर्मित समस्या असतात हे मात्र आपण सोयीस्कररित्या विसरतो. आणि याच समस्यांचे परिणाम निसर्ग काही वर्षांनी आपल्याला भोगायला लावत असतो. उदा. जागतिक तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका येथील बर्फ दिवसेंदिवस वितळत आहे. तसेच १९५० पासूनच पृथ्वीचे तापमान वाढत गेले. मात्र आता आपल्याला अनियमित वातावरणातील बदल पाहायला मिळत आहे. ही समस्या मानवी जीवनाचा नाश करणारी समस्या असल्याने आपल्याला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
 
वायू प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, कचरा प्रदूषण या सगळ्या समस्या यामुळेच व्यक्तीच्या पुढे आल्या आहेत. पृथ्वीचा ओझोन थर विरळ होत असल्याने जागतिक तापमान आणि अंटार्क्टिका प्रदेशावरील बर्फ दिवसेंदिवस वितळत आहे. जगाची ७.१९ बिलियन एवढी मोठी लोकसंख्या सर्व नैसर्गिक संसाधनांना संपवीत आहे. माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाचा जीव घेत आहे.
 
सर्वांना माहीत असलेली मात्र तरीही दुर्लक्षित अशी या ग्लोबल वॉर्मिंगची कारणं : 
 
१. झाडांची संख्या कमी होणे.
२. सिमेंटचे जंगल दिवसेंदिवस वाढणे.
३. पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा अमाप उपसा करणे.
४. कारखान्याचे विषारी वायू हवेत सोडणे.
५. दुचाकी आणि चारचाकीचा वाढता वापर.
६. हवामानात कार्बन, सल्फर आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढणे.
७. अल-निनो आणि ला-निनोचा वातावरणात वाढता प्रभाव.
 
पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे याला अजून एक बाब जबाबदार आहे. ‘ग्रीन हाउस इफेक्ट’ हे जागतिक तापमान वाढीत महत्वाची भूमिका बजावत आहे. आता ‘हरितगृह परिणाम’ म्हणजे नेमकं काय? याला आपण एका उदाहरणाने समजून घेवूयात. “एका गाडीच्या सर्व काचा बंद करून तिला भर उन्हात उभे करणे यामुळे गाडीच्या आतील तापमान हळूहळू वाढू लागेल आणि शेवटी तापलेल्या गाडीत माणसाला बसणे अशक्य होईल”. अश्याच प्रकारची स्थिती पृथ्वीसोबत मानव सध्या करत आहे.
 
 

 
 
 
मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण हे पृथ्वीच्या नैसर्गिक पातळीपेक्षा अत्यंत जलद गतीने वाढत आहे. याचाच अर्थ पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांसारख्या हरितगृह वायूंचे पृथ्वीवरील उत्सर्जन वाढत चालले आहे. निसर्गतःच हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण हे जवळजवळ स्थिर असते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह परिणामांची तीव्रता देखील स्थिर असते. नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे वातावरण उबदार बनून सरासरी तापमान १५ सेल्सिअस एवढे राखले जाते. मात्र वाढते प्रदूषण, मिथेनचे उत्सर्जन, ऑक्सिजनचा अभाव, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. नैसर्गिक हरितगृह परिणाम नसता तर वातावरणाचे सरासरी तापमान -२० सेल्सिअस इतके खाली गेले असते आणि आपली पृथ्वी बर्फाचा थंड गोळा झाली असती मात्र सध्या याच्या उलटी परिस्थिती मानव निर्माण करत आहे.
औद्योगिकरणामुळे कारखाने वाढले आणि यामुळे मानवाच्या गरजा देखील वाढल्या, मात्र या सगळ्यांमधून आपण पृथ्वीला हानी पोहोचवत आहोत हे मानव विसरला आहे. कारखान्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन, कार्बन आणि हानिकारक वायू यांचे उत्सर्जन होत असते आणि यामुळे पृथ्वीच्या भोवती असणारा ओझोन थर देखील नष्ट होतांना दिसत आहे. सूर्यावरून पृथ्वीवर जी हानिकारक किरण येतात त्यापासून ओझोन थर आपले संरक्षण करीत असतो मात्र कारखाने, वाहन वाढल्याने दिवसेंदिवस हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढत असल्याने हा ओझोन थर कमी होत चालला आहे आणि यामुळे पृथ्वीचे तापमान अधिकाधिक उष्ण होत आहे.
 
 
जागतिक तापमानवाढीमुळे अनेक पर्यावरण विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पृथ्वीवरील दुर्मिळ जीवांचा नाश तर होतचं आहे यासोबत महासागरांच्या आम्लीकरणासारख्या समस्या देखील गंभीर रूप धारण करत आहे. आत्ताच्या परिस्थितीचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, या शतकात जागतिक सरासरी तापमान दर दशकात ०.३ ते ०.१ सेल्सिअस इतके वाढत असते. तर हेच तापमान २०२५ पर्यंत १ सेल्सिअसने वाढेल. याचाच अर्थ दिवसेंदिवस आपली पृथ्वी अधिक गरम आणि निस्तेज होत जाईल मात्र मानवाने हरितगृह वायूंचे उत्सर्जन नियंत्रणात आणले तर ही तापमानवाढ नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
 
नेहा जावळे.