उमराओ-जान अदा.. एक सुरेख सांगीतिक अनुभव

    23-Aug-2019
नावावरुन आपल्याला लक्षात आलंच असेल हे कशा बाबत आहे. आपण सगळ्यांनाच उमराओ जान म्हटलं की डोळ्यांपुढे “दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिये” वर नृत्य करणारी रेखा आठवली असेल. किंवा काहींना ऐश्वर्या देखील आठवू शकते, मात्र त्याची शक्यता जरा कमीच आहे. तर अशा या अजरामर कलाकृती उमराओ जान ला पुन्हा एकदा नवीन स्वरुपात संगीत नाटकाच्या रुपात साकारण्यात आलं आहे. आणि लाईव्ह नृत्य आणि गाण्याचा संगम असलेल्या या संगीत नाटकाचा अनुभव विलक्षण आहे.
 
 
त्याचं कारण म्हणजे यामधील कलाकार, त्यांचा अभिनय, त्यांचे गायन, त्यांचे नृत्य, वादन आणि रंगमंच. सगळच भावणारं आहे. लखनऊच्या नवाबी विश्वात घेऊन जाणाऱ्या या नाटकाच्या पहिल्या पर्वाचा शेवटचा प्रयोग नुकताच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे पार पडला. आणि कलेचे कद्रदान अनेक प्रेक्षक हा प्रयोग बघायला आले होते.

 

उमराओ जानच्या भूमिकेत प्रतिभा सिंह बघेल ही तिच्या नावा प्रमाणेच अतिशय प्रतिभावान मुलगी आहे. तिला अनेक रिएलिटी शो मध्ये आपण बघितलेच असेल. तिच्या सुरेल आवाजाने आणि सुरेख रुपाने एका वेगळ्याच विश्वात नेलं. ते विश्व होतं गाण्यांचं, कथकचं, नवाबांचं आणि खानम अम्मीच्या कोठ्याचं सुद्धा.
 
 
 
 
खरंतर कलाकृतीची पार्श्वभूमीच अशी आहे, त्यामध्ये असे सगळे प्रसंग आलेच. मात्र नवाब सुल्तान आणि उमराओ जानच्या अधुऱ्या प्रेमकथेचं ‘शायराना’ वर्णन मोहात पाडण्यासारखं आहे. याकडे केवळ एक कलाकृती म्हणून बघितलं तर आपण प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाच्या प्रेमात पडतो. खानम अम्मीच्या भूमिकेत कृतिका माहेश्वरी ही एक प्रसिद्ध टीव्ही कलाकार आहे. याचे दिग्दर्शन राजीव गोस्वामी यांनी केले आहे, तर याला संगीत प्रसिद्ध संगीत दिर्गर्शक सलीम सुलेमान या जोडीने दिले आहे.
या नाटकाची खासियत म्हणजे यातील कथक. कथक नृत्याची जाण असणाऱ्या आणि आवड असणाऱ्या सर्व लोकांनी हे नाटक अवश्य बघावं. लयकारी, हस्तक, तत्कार, तोडे तुकडे सर्वच आहे यात. मात्र केवळ दरबारी कथकचेच दर्शन यामध्ये होते. कथकचे खरे पवित्र स्वरूप यामध्ये दिसत नाही हे देखील तितकेच खरे.
 
 
उर्दू भाषेचा पगडा या नाटकावर असल्या कारणाने अनेकांना हे नाटक जड जाऊ शकतं. मात्र नेहमीच्या वीकेंड मूव्ही प्लान पेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी आम्हाला हे ऑप्शन फार आवडलं. कारण काहीतरी नवीन बघायला मिळालं. याच स्वरुपात आपल्या संस्कृतीतील आणखी काही भव्य दिव्य बघायला आणखी मजा येईल असं देखील वाटून गेलं.
नृत्य आणि संगीताच्या वेगळ्या अनुभवासाठी हे नाटक नक्की बघावं.