काश्मीरमध्ये शिक्षणाचा विकास करण्यासाठी पुण्याने टाकले एक पाऊल पुढे

    23-Aug-2019
धरतीवरील स्वर्ग कुठे आहे असे विचारल्यावर आपल्या डोळ्यांपुढे काय येतं? तर ते म्हणजे काश्मीर. प्रकृतीने जर देशातील कुठल्या भागाला भरभरून दिले असेल तर ते म्हणजे काश्मीर. तर असे हे काश्मीर आता पर्यंत दहशतवाद, भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले होते. मात्र आता कलम ३७० रद्द झाल्यावर तेथील परिस्थिती बदलण्याचा निश्चय आपल्याच काही बांधवांनी, काही संस्थांनी केला आहे. आणि काश्मीरमध्ये आता शिक्षणाचा योग्य विकास व्हावा यासाठी आपल्या लाडक्या पुण्याने एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं आहे.

 
काश्मीरबद्दल सरकारच्या महत्वाच्या निर्णयानंतर काश्मीरच्या विकासासाठी पुण्याच्या सरहद या संस्थेने जम्मू काश्मीरच्या राज्यपालांना पत्र लिहून सांगितले आहे की, महाराष्ट्रातील सुमारे २५ संस्था आमच्या संपर्कात आहेत, ज्यांना काश्मीर येथे शिक्षणाचा विकास करण्याची इच्छा आहे. या पत्रात त्यांनी यामधील ७ संस्थांचा उल्लेख केला आहे, ज्यांना काश्मीर येथे महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करायचा आहे. यामध्ये पुण्यातील फर्गसन कॉलेज, डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठ, भारती विद्यापीठ, गरवारे कॉलेज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटी यांचा समावेश आहे.
आपल्या पुण्यातील काही संस्थांनी पुढे येत काश्मीरच्या विकासासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, ही एक मोठी आणि अभिमानाची बाब आहे. ‘आमच्या कुठेही शाखा नाही’ असे म्हणणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध फर्गसन महाविद्यालयाची शाखा काश्मीर येथे सुरु झाली तर किती छान वाटेल नाही? काश्मीरमध्ये आता एक नवीन पर्व सुरु झाले आहे. आणि आपली पिढी भाग्यवान आहे, की आपल्याला या पर्वाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे.