“Climate Change is reality” : हे भयानक सत्य येतंय पुढे

    23-Aug-2019
अनेकांकडून तुम्ही क्लायमेट चेंज विषयी भरपूर काही ऐकलं असेल. मात्र आपली पिढी आणि आपल्या नंतर येणारी पिढी हे भयंकर सत्य अनुभवतेय, अनुभवणार आहे हा विचार करून अंगावर शहारा येत नाही का? अॅमेझोन रेन फॉरेस्टचे फोटोज बघितले आणि धस्स झालं. अॅमेझॉन रेनफॉरेस्टला ‘लंग्स ऑफ द अर्थ’ म्हटलं जातं. या रेन फॉरेस्ट मधून धरतीवरची २० टक्के ऑक्सिजन मिळते. आणि सुमारे 5.5 मिलिअन कि.मी. वर पसरलेलं हे रेन फॉरेस्ट गेल्या ३ आठवड्यांपासून पेटलंय. या ज्वाला स्पेस मधून देखील दिसताएत आणि क्लायमेट चेंजचे हे भीषण सत्य पुन्हा एकदा आपल्या समोर येऊन उभं राहिलंय.

 
या पेटलेल्या वणव्यामुळे अॅमेझॉन पासून कितीक मैल दूर असलेल्या साओ पाओलो या शहरात दिवसा ढवळ्या अचानक काळ्या धुराच्या ढगांमुळे काळोख पसरला. एकूण काय तर याचा परिणाम इतका भीषण आहे कि ब्राझीलचे जीवन यामुळे अस्ताव्यस्त होऊ शकते. गेल्या एका वर्षात या रेनफॉरेस्ट मध्ये पेटणाऱ्या वणव्यांमध्ये ८३ % ची वाढ झालीये. धरतीचं इतकं मोठं नुकासन होतंय आणि आपण काहीच करु शकत नाहीयोत, आपण हतबल आहोत. We are Helpless.
तुम्ही एक नोटीस केलं का? यंदा भारतात महाराष्ट्रासह अधिकाधिक राज्यांमध्ये भीषण पूर आला. दिल्लीत आलेली Heat wave भयंकर होती. पाऊस प्रमाणापलिकडे, दुष्काळ प्रमाणापलिकडे आणि यंदाची थंडीही प्रमाणापलिकडे होती. हे सर्व बघता आपल्या लहानपणी म्हणजे साधारण १५-२० वर्षांआधी असं होत होतं का? आठवलंत तर उत्तर मिळेल नाही. पूर एखाद्यावेळी यायचा, आता दर वर्षी येतो. केरळ येथे गेल्या वर्षीही आला, यावर्षीही येत आहे, सतत येणारे भूकंप अतिशय भयंकर आहेत. आणि निसर्गाच्या या प्रकोपामागे आपला देखील खूप मोठा हात आहे.
आपण आपल्या समुद्रांची परिस्थिती बघितली तर, आल्या दिवशी अमुक एका समुद्र काठावर मेलेली व्हेल सापडली, तिच्या पोटात अमुक टन प्लास्टिक कचरा सापडला अशी बातमी कुठे न कुठे वाचायला मिळते. पर्यटनास गेलो तर अनेकदा हे दृश्य (समुद्रात प्लास्टिकचा कचरा दाखवणारे) आपल्या डोळ्यासमोर दिसते. अनेक लोक आपल्याच समोर समुद्रात चिप्सचे पाकीट, बिस्किटांचे पाकीट टाकताना दिसतात. आणि जेव्हा मग या इवल्याशा गोष्टीचं रूपांतर भयंकर पुरात किंवा त्सुनामी मध्ये होतं, तेव्हा आपण उध्वस्त होतो.
परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत जाणार आहे. तुम्ही आणि मी एकच करु शकतो. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करणे, आपल्यापुरती आणि आपल्या आस पासच्या परिसरापुरती स्वच्छतेची काळजी घेणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबविणे, कचरा न करणे इतकी छोटी छोटी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो. आज अॅमेझॉनला आग लागली आहे, उद्या संपूर्ण धरतीला लागेल तेव्हा काय करु? याचा विचार करुयात आणि आज पासूनच आपला वाटा उचलूयात.