‘हम आपके हैं कौन’... २५ वर्षे एका सुरेख अनुभवाची..

आपल्या आयुष्यात आपण अनेक गोष्टींपासून प्रभावित असतो. किंवा आपल्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. त्यापैकी चित्रपट एक खूप महत्वाचा घटक आहे. आणि काही चित्रपट असे असतात जे नेहमीसाठी मनाच्या एका कप्प्यात घर करून राहतात. त्या चित्रपटांशी अनेकांच्या आठवणी जोडल्या असतात, तर ‘शोले’ सारखे काही चित्रपट प्रत्येका पिढीला आपलेसे वाटतात. ९० च्या दशकात आलेला ‘हम आपके हैं कौन’ हा देखील अशाच काही ‘खास’ चित्रपटांपैकी एक. या वर्षी या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. माझ्या सारखी अनेक लोक आपला २५वा वाढदिवस या चित्रपटासोबत साजरा करतील. आजचा हा लेख अशाच काही लोकांसाठी.
 

 
 
प्रेम, निशा,पूजा भाभी, राजेश भैय्या, लल्लू, काकाजी इतकेच काय तर टफी आपल्याच घरातील एक व्यक्ति वाटते नाही का? आजही झी सिनेमावर ‘हम आपके हैं कौन’ लागला कि असंख्य घरातील काही लोक (माझ्याच सारख्या काही मुली खासकरुन) टीव्ही समोर खिळून बसतात, आणि घरातील इतर लोक झालं का पुन्हा सुरु असं म्हणतात, तर काही भाऊ बहिणींकडून रिमोट हिसकावून घेतात, काही नवरे मुकाट्याने हम आपके हैं कौन बघत बसतात, तर काही आवडीने साथ देतात. तर असा हा चित्रपट देशातील असंख्य लोकांच्या आवडीचा. १९९४ मध्ये हा चित्रपट आला मात्र या चित्रपटाचा ताजेपणा आजही जाणवतो.
 
 
१४ गाणी असणाऱ्या या चित्रपटातील गाण्याचे बोल आजही आमच्या पिढीतील (९०ज किड्स) सगळ्यांना तोंडपाठ आहेत. मैत्रीणींसोबत कोणाला सगळ्यात जास्त डायलॉग्स पाठ आहेत अशी स्पर्धा देखील अनेकांच्या घरात होत असते. पूजा भाभीच्या मृत्युनंतर टीव्ही ऑफ करणारे अनेक लोक आहेत, तर शेवटच्या सीनमध्ये टफीची हुशारी बघण्यासाठी देखील आतुर असलेले अनेक लोक आजही मी बघितले आहेत. हा चित्रपट कुणी बनवला, कधी आला,यात कोण कोण होते याची माहिती खरंतर देण्याची आवश्यकता ही नाही, आणि ती आपल्याला इंटरनेटवर मिळेलच. पण या चित्रपटांनी आम्हाला काय दिलं? हे मी आज सांगणार आहे.


या चित्रपटानी आमच्या पिढीतील मुलींना काय दिलं? तर निशा सारखा फॅशन सेन्स असावा म्हणून आमच्या सारख्यांच्या प्रत्येकाच्या वॉर्डरॉब मध्ये नेटचे लांब घेरदार लाल फ्रॉक्स, किंवा सेटिनचे गुलाबी फ्रॉक्स नक्कीच दिले. प्रेम सारखा एक जोडीदार असवा जो आपल्या कर्तव्यांची जाण ठेवेल मात्र मनापासून भरपूर प्रेम करेल. एकत्र कुटुंब असावं जे सुखात नांदावं, ज्यात मामा मामी असावे, दादा वहिनी असावे, वडील धारी माणसे असावी असे स्वप्न दिले, मुक्या जनावरांमध्ये देखील देव असतो ही जाणीव दिली. आणि परिवार सोबत असेल, भावांचं एक मेकांवर प्रेम असेल तर सगळं शक्य आहे, हे सांगत परिवारांना बांधून ठेवणारा धागा दिला.
 
 
आमच्या सारख्या अनेकांवर हसणारी भरपूर लोक आहेत. काय ते परिवार परिवार, काय हे १४ गाणी, सारखा एकच एक मूव्ही कसा बघवतो बरं तुम्हाला असे विचारणारे पण भरपूर आहेत. मात्र काही का असेना एक क्यूट, स्वीट, प्रेमळ अशी प्रेमकथा आणि सोबत अशक्य भारी कलाकारांचा अभिनय असेल तर का हा चित्रपट ५० हजार वेळा बघू नये?
 
 
यामुळे मला निशा सारखं खोडकर तरी वेळ पडल्यावर मॅच्योर वागावंसं वाटतं. यामुाळे राजेश भैय्या सारख्या अनेक विदुर मुलांना नवीन आय़ुष्य मिळावं असं वाटतं, यामुळे जावायाला मुलगा मानणारे आई बाप अनुपम खेर आणि रीमा लागूच्या रुपात दिसतात, यामुळे कैलाशनाथ कितीही पैसेवाला असला तरी घराला घरपण देणारी सून त्याला हवी असते हे जाणवतं, यामुळे लल्लू सारखे किती तरी घरकाम करणाऱ्या माणसांविषयी प्रेम वाटतं, यामुळे दर्जेदार अभिनय करणाऱ्या एका मोठ्या फळीचं एकसाथ दर्शन होतं. आणि म्हणूनच हम आपके हैं कौन आजही पूर्ण पाठ असतो, आणि कधीही लागला की बघायचाच असतो. शास्त्र असतं ते..
 
 
तर सलमान माधुरीसाठी, धिकतनं धिकतनं आणि पहला पहला प्यार साठी, पूजा भाभी साठी आणि टफीसाठी कितीही वेळा हा चित्रपट लागला कि तो बघायचाच. काहीही झालं तरी... तेव्हाच तुम्ही या चित्रपटाचे खरे फॅन्स ठरता.
 
 
आज सूरज बडजात्या, राजश्री प्रोडक्शन्स आणि हम आपके हैं कौनच्या सर्व टीमला एक मोठ्ठं थॅंक्स, कारण त्यांच्यामुळेच एक सुरेख अनुभव मिळाला जो सदैव आमच्या सोबत राहील, मनाच्या एका कप्प्यात घट्ट घर बनवून, थकून आल्यावर खरचटल्यावर फुंकर मारण्यासाठी आणि कधी कधी सहज जुन्या मित्राशी गप्पा केल्याचं फीलींग देण्यासाठी…
 
 
“हम आपके हैं कौन…..” २५ वर्षे….. तुमच्या आमच्या.. सगळ्यांच्या भावनांची, सगळ्यांच्या मनाच्या कप्प्यात खोल वसलेल्या एका सुरेख अनुभवाची.