माणसांची श्रीमंती

    26-Dec-2019   
|

Wealth_1  H x W

कालच आम्ही तीन मित्र बोलत होतो, तेव्हा एक जण म्हणाला अरे माझ्या मावशी चा बंगला खूप मोठा आहे, प्रचंड श्रीमंत आहे ती. त्याच्यावर दुसरा मित्र म्हणाला की हे सगळ सोड माझ्या मित्रानी तर दहा लाख रुपये देऊन ऍडमिशन मिळवली, म्हणजे विचार कर त्याच्याकडे केवढा पैसा असेल.

हे सगळे ऐकताना मला अजिबात विचित्र वाटलं नाही कारण माझी श्रीमंतीची व्याख्याच वेगळी आहे. माझ्या श्रीमंतीचे व्याख्या तीन शब्दात येते; शिधोरे, चाफेकर आणि सोमण. (बाबांचे आजोळ, आईचे आजोळ आणि माझे आजोळ)

चक्रावला असाल ना, पण खरं सांगायला गेलो तर माझ्या श्रीमंतीचे मूल्यमापन मी पैसा, दागदागिना, मालमत्ता यांच्यात न करता माणसांमध्ये करतो. माझ्या जवळ असलेली माणसं मला दागदागिने पेक्षा जास्त मौल्यवान आहेत. मी भयंकर श्रीमंत आहे कारण माझ्याकडे मला हवी असलेली सगळी माणसं आहेत, निरनिराळ्या वयाची, वेगवेगळ्या स्वभावांची, अनुभवाने ही प्रचंड श्रीमंत असलेली.

आज कालच्या न्यूक्लियर फॅमिली च्या जगामध्ये 'कधीतरी चहाला या' हे वाक्य घरी अजिबात येऊ नका या अर्थाने बोललं जातं. पण माझ्या नात्यातल्या माणसांकडे एखादा पोस्टमन जरी आला तरी त्याला पोटभर जेवून पाठवण्याची रीत आहे. माणसांना कसं जोडून ठेवायचं आणि त्यांच्याशी ऋणानुबंध कसे जुळवून ठेवायचे हे मी माझ्या नात्यातल्या लोकांकडून नक्कीच शिकलो.




Family_1  H x W

आमच्या घराचे दार तुमच्या साठी सदैव उघडे आहे हा आता फक्त चित्रपटातला संवाद उरलेला आहे. पण माझ्या नात्यातल्या लोकांच्या घराचा दरवाजा दिवसभरात एकदाही बंद नसतो हे मी खूप वेळेला बघितलेले आहे.

स्वयंपाक केला की तो चार जणांचा नसून किमान घरी दहा लोक जेवायला असतील याचा अंदाजाने केला जातो.

कधीही कुठला पाहुणा किंवा अनोळखी माणूस आला तरीही कोणाचही तोंड वाकडं नसतं, हसऱ्या चेहऱ्याने त्याचं स्वागत केले जातं.

अनेक भावंड असल्यामुळे सण विभागून घेऊन प्रत्येकाच्या घरी त्याची मजा लुटण्याचा आनंदच काहीतरी वेगळा आहे. तो आनंद आजच्या छोट्या कुटुंबात नक्कीच नाही. छोट्या कुटुंबात काही गैर आहे असे मला वाटत नाही पण ती लोक ह्या आनंदाला नक्कीच मुकत आहेत.

अनेक लोकांना त्यांचे नातेवाईक आले किंवा खूप माणसं जमली की किरकिर होते, त्यांचा संताप होतो पण एकदा का गप्पा रंगल्या, जुने किस्से, आठवणी निघाल्या की त्यासारखी दुसरी मज्जा कुठलीच नाही.


Family_1  H x W

आजकालची जगण्याची व्याख्या म्हणजे भरपूर पैसे असणं अशी झालेली आहे. पण मला विचाराल तर माणसं आणि जपलेली नाती यांच्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही. पैसा कमावता येतो पण एकदा नाती गमावली कि ती जोडणं ब्रह्मदेवाला ही शक्य होत नाही.

काही वेळेला घरातल्यांशी जितकी जवळीक वाटत नाही त्याच्यापेक्षा जास्त जवळीक नातेवाईकांशी वाटते. त्यांची कौतुकाची थाप त्यांनी सांगितलेल्या सुधारणा कायम लक्षात राहतात.

अनेक जणांना माणसांची किंमत ते गेल्यावर कळते पण जिवंतपणी त्यांना जीव लावण जमत नाही. अशी लोक आयुष्यात खुप काही गमावतात असं मला वाटतं.




Family_1  H x W



माझी श्रीमंती पैशात नसेल पण नात्यांबद्दल बोलायला गेलं तर मी टाटा बिर्ला आणि अंबानी पेक्षा श्रीमंत आहे हे मी नक्की सांगू शकतो.


- अथर्व आगाशे