गॉनकेश.. एक सुरेख अनुभव

|

 

gone kesh_1  H



काही चित्रपट असे असतात जे फार काही फॅन्सी नसतात, ज्यांची स्टारकास्ट खूप भारी नसते, मात्र त्याच्यातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाची कथा आणि एकूणच चित्रपटाचं फीलिंग खूप सुरेख असतं. गॉनकेश असा एक चित्रपट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ‘बाला’ आणि ‘उजडाचमन’ या चित्रपटांमुळे टक्कल पडण्यावर, कमी वयात केस जाण्यावर आणि एकूणच ‘केस गळणे’ या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. मात्र हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी याच विषयावर आलेला हा ‘गॉनकेश’ नावाचा चित्रपट या दोन्ही चित्रपटांपेक्षा कैक पटीने उत्तम आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

मसान आणि मिर्जापुर मधून प्रसिद्ध झालेली श्वेता त्रिपाठी हिने या चित्रपटात मुख्यभूमिका साकारली आहे. इनाक्षी दासगुप्ता असे या पात्राचे नाव आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच इनाक्षीला बघायला मुलाकडचे आलेले असतात, मात्र जेव्हा त्यांना इनाक्षीच्या केसांविषयी अनेकदा सांगूनही कळत नाही, तेव्हा इनाक्षी आपलं विग काढते, आणि मुलाकडचे चिडून निघून जातात. इनाक्षीच्या आयुष्यात केवळ तिचे आई वडील मॉलमध्ये असलेला तिचा जॉब इतकंच असतं, मात्र तिच्या आयुष्यात आणखी एक महत्वाची गोष्ट असते, आणि ती म्हणजे तिची नृत्यकला. मात्र एके दिवशी कळतं इनाक्षीला एलप्सिया नावाचा आजार आहे. हळू हळू इनाक्षी आणि तिला असलेल्या केस गळण्याच्या समस्येविषयी उलगडा होत जातो आणि आपण या चित्रपटात आणखीनच गुंतत जातो. 


gone kesh_1  H


इनाक्षीची निरागसता, तिच्या वडीलांचे छोटेसे घड्याळाचे दुकान असून सुद्धा इनाक्षीच्या उपचारासाठी मारलेले हातपाय, तिच्या आईचे स्वत:च्या स्वप्नांवर केवळ इनाक्षीच्या भविष्यासाठी पाणी सोडणे, तिच्या वडीलांचे एकदा प्लेन मध्ये बसण्याचे स्वप्न, आईचे सिलिगुडी बाहेर पडून आगऱ्याचे ताजमहल बघण्याचे स्वप्न सगळंच आपल्याला खूप गुंतवून ठेवतं. इनाक्षी ज्या पद्धतीने तिला झालेल्या आजाराला लढा देते, तिच्या टक्कल असलेल्या चेहऱ्याला एक्सेप्ट करताना तिला झालेला त्रास हा कुठेतरी आपल्यालाही जाणवतो. एक खूपच सरळ, साधी, सुंदर अशी ही कथा आहे.



या कथेची आणखी एक हळवी बाब, एक महत्वाचे पात्र म्हणजे इनाक्षीवर मनापासून प्रेम करणारा श्रीजॉय. त्याला इनाक्षी कॉलेजपासूनच आवडत असते, तिचे नृत्य, तिचा लाघवी स्वभाव, तिचे बोलणे त्याला सगळंच आवडत असतं, मात्र तिला जावून हे सांगण्याची त्याच्यात हिंमत नसते. मात्र त्याला इनाक्षीचे सत्य कळल्यावरही त्याचे तिच्यावरचे प्रेम कमी होत नाही, आणि चित्रपटाची सगळ्यात सुरेख बाब हीच आहे. परमनेंट रूममेट्स मधल्या गिट्टू या पात्रापासून प्रसिद्ध झालेल्या जितेंद्र कुमार याने ही भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध कलाकार दीपिका आमिन आणि विपिन शर्मा यांनी तिच्या आई वडीलांची भूमिका साकारली आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे कासिम खालो यांनी. कधी कधी काही चित्रपट अतिशय सुरेख असूनही दुर्लक्षित ठरतात, मात्र अशाच चित्रपटांची आजच्या काळात खूप जास्त गरज आहे असेही हा चित्रपट बघताना वाटून जाते. इनाक्षीला एका नृत्यस्पर्धेत भाग घ्यायचा असतो, त्यासाठी ती तिची नोकरीही सोडते, मात्र ती ही स्पर्धा जिंकते का? पुढे काय होतं ? हा चित्रपट बघितल्यावरच कळतं. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. हा चित्रपट खरं तर मार्च २०१९ मध्ये आला होता, मात्र तो बघण्याचा योग काही दिवसांपूर्वी आला. टक्कल पडण्यासारख्या गंमतीत घेतल्या जाणाऱ्या मात्र खूप महत्वाच्या विषयावर तीन चित्रपट आले, त्यातील ‘बाला’ मध्ये तर आयुष्यमान खुराना होता मात्र त्याच्या अभिनयाला देखील चॅलेंज करणारा अभिनय श्वेता त्रिपाठी ने केला आहे. 

चित्रपट बघणे ही देखील एक कला आहे. तो बघत असताना आपण एक अनुभव जगत असतो. कधी हा अनुभव खूपच सुरेख असतो तर कधी वाईट. एक सुरेख अनुभव जगण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी नक्कीच बघावा. कारण.. काही चित्रपट हे मनोरंजनासाठी नाही तर एका सुरेख अनुभवासाठी बघायचे असतात. 

- निहारिका पोळ सर्वटे