हे सुरांनो चंद्र व्हा; भारदस्त पण सुरेल!..

    12-Dec-2019
|

savai_1  H x W:
६७वे सवाई गंधर्व महोत्सव -
दिवस एक, सत्र तिसरे- गायिका श्रीमती अर्चनाताई कान्हेरे


सवाई गंधर्व अनुभवण्याच माझं हे अवघ तिसरं वर्ष. संगीताची जशी मनापासून जाण आली तसं एक आतलं, पण अगदी सोपं, महत्वाचं सूत्र कळलं, ते म्हणजे 'श्रावण भक्ती, सर्वोत्तम शक्ती'. जितकं वेगळं, वेगवेगळ्या गायकांचं संगीत ऐकणार, राग मांडणी ऐकणार, समजून घेणार, तितकंच शिकत जाणार. अशा वेळी सवाई गंधर्व महोत्सवासारखं दुसरं काय!
 
माहितीतल्या व सुप्रसिद्ध कलाकार, प्रभाताई अत्रे, अस्विनीताई देशपांडे, मंजिरीताई अलेगावकर, विराज जोशी, अजय चक्रवर्ती, पं जसराज या गायकांच्या व्यतिरिक्त, सवाई महोत्सवात, आवाजाची नवी पोत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी होती ती श्रीमती अर्चनाताई कान्हेरे यांची. भारदस्त, घोगरा पण सुरेख आणि सुरेल व एक विशिष्ट छाप पाडणारा आवाज कोणाला नाही भावणार?
सवाईमंचावर, कार्यात पूर्णपणे भान विसरलेल्या या माणिक वर्माच्या शिष्येने राग जोग कौंस गात प्रेक्षकांना ओघळत्या सुरांनी मंत्रमुग्ध तर केलेच, पण किराणा घराण्याचे योग्य ते दर्शनही घडवले. 'मदन तेरो रे आयो' या त्रितलात तालबद्ध झालेल्या बंदीशीने सादरीकरणाची रंजकता वाढवत, 'पीड पराई' या दुसऱ्या बंदीशीने प्रेक्षकांना त्रिताल मध्य लयीवर डोलण्यास भाग पाडले.
 
पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात, अर्चनाताईंनी खरी जादू आणली ते सुरावटित मुळातच रंजक असलेल्या तिलक कामोद रागाने. मध्य आणि नंतर मंद्र सप्तकात योग्य आणि आवश्यक ती पकड घेत, 'तन मन मानत कुछ नाही' या झपतालाने उपस्थितांची पसंती मिळवली.

savai_1  H x W:

तर माणिक वर्मांच्या शिष्या आणि नाट्यसंगीत न होणे, हे काही रास नव्हते. संगीतप्रेमियांच्या आग्रहाखातर गायिकेने सभेचा शेवट केला तो 'हे सुरांनो चंद्र व्हा' या नाट्यगीतानेच. गुरू माणिक वर्मा आणि पं जितेंद्र अभिषेकी यांना स्मरण करत अर्चनाताईंनी नाट्यगीताच्या शब्दांत आणि सुरांत जणू जीवच ओतले!

मात्र राग निवड अजून कुशल होऊ शकली असती असे जाणवले. राग जोग कौंस आणि तिलक कामोद दोन्हीही राग एरवी रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी गायले जातात. अर्चनताईंनी हे राग संध्याकाळी सहा ते आठ या समयी सादर केल्याने समयचक्रात नकळत अडथळा निर्माण झाला तो खरा. आवाजात भरदस्तपणा जरी असला, तरी गायिकेच्या सुरेलपणाने मैफिल मात्र पूर्णपणे रंगवली.

विख्यात कीर्तनकार आणि तबलापटू श्री. वासुदेव उपाध्येय हे अर्चनाताईंचे वडील. त्यांच्याकडून संगीताचा वारसा आणि प्राथमिक धडे त्यांना मिळाले असून, संगीत विषयातच अर्चनाताईंनी (बी ए संगीत, प्रथम क्रमांक) व पदव्युत्तर शिक्षण (एम ए संगीत, द्वितीय क्रमांक) उत्तम प्राप्त केले.
गाजलेल्या अनेक संगीतसभांतून त्यांनी गायन केलेले आहे तसेच दूरदर्शनसाठी 'राग एक रंग अनेक' ही मालिका, तर थायलंडमध्ये संगीत प्राध्यापक, असा त्यांचा सांगीतिक प्रवास बराच मोठा आहे. भावभक्तीधारा हा त्यांचा अल्बम प्रसिद्ध आणि मोठा लोकप्रिय आहे.
साथ संगत
हार्मोनियम- सुयोग कुंडलकर
तबला- भरत कामत
 
 
राग जोग कौंस
विलंबित एकताल- हे सुघर परपायो
त्रिताल- मदन तेरो रे आयो, पीड पराई

 
तिलक कामोद
झपताल- तन मन मानत कुछ नाही।
त्रिताल- जा रे भवरा जा, पिया के देस जा

 
नाट्य संगीत- हे सुरांनो चंद्र व्हा

- सिद्धी सोमाणी