फिरोदिया करंडक वाद : निर्णय चूक की बरोबर?

|

 

Firodiya_1  H x

 

फिरोदिया करंडक हे नाव ऐकलेलं नाही असं कदाचितच कुणी असेल. प्रत्येका महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी, विद्यार्थ्यांना एका वेगळ्या जगात नेणारी, आणि प्रतिभावंत कलाकारांना जगासमोर आणणारी स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक. या स्पर्धेने मराठी सिनेसृष्टीला सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, ओम भूतकर, आलोक राजवाडे, वैभव तत्ववादी, अमेय वाघ असे अनेक कलाकार दिले आहेत. गेल्या ४५ वर्षांपासून ही स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात येत आहे. मात्र या वर्षी या प्रतियोगितेच्या फॉरमॅटमध्ये आयोजकांनी थोडा बदल केला आहे. आतापर्यंत या प्रतियोगितेत सॅंसॉरशिप नव्हती. मात्र यंदा या प्रतियोगितेत स्पर्धकांना “कलम ३७०, राम मंदिर, बाबरी मशिद, हिंदु मुस्लिम, जात - पात” अशा विषयांवर कलाकृति सादर करता येणार नाहीये. त्यामुळे याविषयी एकच चर्चा सुरु झाली आहे. 
 
याविषयी आयोजक अजिंक्य कुलकर्णी यांचे मत आहे की, “ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेकदा कुठे थांबावे हे कळत नाही, अनेकदा त्यांच्याकडून मर्यादा रेषा ओलांडली जाते, आणि आताची सामाजिक परिस्थिती बघता, असे होऊ नये यासाठी आयोजन समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.” मात्र विद्यार्थ्यांच्यामते या निर्णयामुळे त्यांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे. आणि यामुळे विद्यार्थ्यांना अशा विषयांवर मते मांडायची असता ती त्यांना मांडता येणार नाही. त्यातून जर कुणी अशा विषयांवर कलाकृति सादर केली, किंवा नियमांबाहेर जाऊन कलाकृति सादर केली तर पुरस्कारांसाठी ती कलाकृति ग्राह्य धरली जाणार नाही, असा नियम देखील करण्यात आला आहे. 
 
“तरुणांनी समसामयिक विषयांवर आपलं मत नाही मांडायचं तर कुणी मांडायचं? कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिस आणि यंत्रणा आहेत. तरुणांच्या मनात समसामयिक विषयांसंबधी खदखद ही असतेच ती बाहेर येणारच. त्यामुळे विषयांवर बंधनं लावणं हे चुकीचं आहे.” असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर एका विद्यार्थ्याने व्यक्त केले आहे. 

 
असे कधी होईल असा विचारच मी केला नव्हता, भारत बदलतो आहे, पण तो असा? असा प्रश्न देखील एका तरुणाने ट्विटरवर उपस्थित केला आहे. त्यामुळे याविषयी आता चर्चेला उधाण आले आहे. 
 
आता हा निर्णय योग्य आहे का बरोबर हे तर काळच ठरवेल, मात्र याविषयी वाद विवाद होणार हे नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय़ योग्य आहे की चूक? आम्हाला नक्की कळवा. कारण तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. ज्या स्पर्धेला स्वत: आशुतोष गोवारीकर यांनी “सिनेमा ऑन स्टेज” असं नाव दिलं आहे, त्यामुळे या स्पर्धेत ४५ वर्षांनतर झालेल्या या बदलावर चर्चा होणारच. त्यामुळे तुमची मते अवश्य सांगा. 

- निहारिका पोळ सर्वटे