दिवाळीचं तेज पसरवणारं ‘वलय’


 

 



दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर अनेक गोष्टी येतात. फराळाचं ताट, दिवे, अभ्यंग स्नान, रांगोळी, आणि काय काय.. मात्र या सगळ्यासोबत दिवाळीमध्ये जर काही सगळ्यात जास्त असेंशिअल असेल तर ते म्हणजे “आकाश कंदील”. पण अनेकदा प्लास्टिकचे आकाश कंदील प्रदूषणासाठी कारण ठरतात. कारण दिवाळीनंतर आपण ते टाकूनच देतो. म्हणूनच आपल्या अशक्य भारी अशा क्रिएटिव्हीटीतून हँडमेड पेपर्सचे आकाश कंदील घेऊन आले आहेत टीम ‘वलय क्राफ्ट’ आणि या टीम वलयच्या मागे आहे आर्किटेक्ट गायत्री सावजी कुलकर्णी. 

सोलापुरातून सुरु झालेल्या या छोट्या प्रयोगामागे कष्ट मात्र खूप मोठे आहेत. गायत्री सांगते “ मी लहानपणापासूनच आकाशकंदील घरी करायचे. ज्याच्यात थोडी फार कला किंवा क्रिएटिव्हीटी असते त्याच्याकडून असं काही आपोआपच घडत जातं, त्याला ते सुचत जातं. तसंच माझ्यासोबत झालं. हळू हळू या आकाशकंदीलांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. मग मित्र परिवाराला आकाशकंदील करुन देणे, किंवा भेट म्हणून आकाशकंदील देणे हे सुरु केले. लग्न झाल्यानंतर नाशिक येथे आम्ही दोघांनी मिळून आकाश कंदील घरी करण्याचा प्रयोग केला. मात्र या वर्षी काहीतरी मोठे करायचे असे आधीपासूनच ठरवले होते. आणि मग जन्माला आलं ‘वलय क्राफ्ट’. 



 
गयात्रीने जे कंदील नाशिक मध्ये असताना तयार केले होते, ते आकारात मोठे होते, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात बनवून पार्सल थ्रू पाठवणे कठीण होते. कंदील बनवताना अनेक प्रयोग त्या दोघांनी मिळून केले. कापडाचे कंदील, लाकडाचे कंदील, कागदाचे कंदील असे अनेक प्रयोग केले. काही फसले काही यशस्वी झाले. मात्र मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचे असेल तर एका मटेरिअल वरच विचार करावा, असे टीम वलय क्राफ्टला वाटले आणि म्हणूनच कागदाचे कंदील तयार करावे असा निर्णय झाला. 

या कंदीलची खासिअत म्हणजे : 

१. हे अतिशय देखणे आहेत. 
२. हे बनवणे अत्यंत सोपे आहे. म्हणजे यूजर फ्रेंडली आहेत. 
३. याचं पॅकेजिंग देखील साधं सोप्पं मात्र आकर्षक आहे. 
४. या मध्ये बनविण्याची विधी QR Code स्कॅन करून व्हिडियोच्या माध्यमातून दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे बनविण्यास अधिक वेळही लागत नाही आणि सोपे देखील जाते. 
५. या आकाश कंदीलांचा वापर दिवाळीनंतर खोलीमध्ये साईड लँप म्हणून देखील करता येऊ शकतो. 
६. कागदाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे, फिनिशिंग सुंदर आहे आणि हवे असल्याल मॉडर्न आणि हवे असल्यास पारंपारिक कंदील उपलब्ध असल्यामुळे मनासारखे आकाशकंदील मिळू शकतात. 


मात्र आकाशकंदील इतक्या मोठ्या प्रमाणात तयार करणे म्हणजे काही गंमत नव्हे. गायत्री आणि तिच्या टीमने १५०० कंदील तयार केले आहेत. सोलापुर येथे जिथे अनेकदा एडव्हान्स्ड सुविधा उपलब्ध नसतात तिकडे अतिशय प्रोफेशनल असे कंदील तयार करुन टीम वलय ने हे परदेशात देखील पाठवले आहेत. ‘जमिनीच्या जवळचे काहीतरी असावे, जे पृथ्वीला कुठल्याही प्रकारे त्रासदायक असणार नाही,” असा विचार करुन टीम वलय ने हे इको फ्रेंडली ‘DIY’ कंदील बनवले आहेत, असे गायत्री सांगते. 

संस्कृति आणि तंत्रज्ञानाची सांगड घालण्यासाठी टीम वलय ने QR Code ची आयडिया लढवली. तसेच यूट्यूबच्या व्हिडियोजच्या माध्यामातून हे तयार करण्याची विधी समजावण्यात आली. सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील हे कंदील जगभरात पोहोचले. 
 
 

हे कंदील बनवत असताना अनेक अडचणी समोर आल्या. आधी कागदाचे मटेरिअल मार्केट स्टडी यासाठी सोलापुर सारख्या नवीन ठिकाणी लोकांना शोधणे म्हणजे एक चॅलेंज होते. त्यानंतर लेझर कटिंग करुन देणारे लोक मिळवणे, मटेरिअल वाया जाणे, अंदाज चुकणे अशा अनेक गोष्टी घडल्या मात्र आज जेव्हा या कंदीलांना इतका छान प्रतिसाद मिळतोय, १२०० कंदील लोकांच्या घरात सजणार आहेत / सजलेले आहेत तर आम्हाला आनंद झाला आहे की आमचा पहिलाच प्रयोग सफल झाला आहे, असे गायत्री अतिशय आनंदाने सांगते. 



गायत्री सावजी कुलकर्णी 
 
आपल्या नोकरी व्यवसायाशिवाय केवळ आपल्या पॅशन मधून या पृथ्वीसाठी काहीतरी चांगले आणि क्रियेटिव्ह करता येऊ शकते याचे हे जीवंत उदाहरण आहे. अनेकदा वेळ मिळत नाही म्हणून चांगली कला असणारे लोक देखील आपल्या कलेला आपल्यापासून दूर सारतात, असे असताना गायत्री आणि टीम वलय ने अतिशय सुंदर अशा या आकाश कंदीलांनी अनेकांची घरे उजळली आणि अनेकांना आपले पॅशन जपून काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा दिली आहे. हे मात्र नक्कीच. 

- निहारिका पोळ सर्वटे